March 05, 2011

कोश


स्वच्छंदी फिरणारी फुलपाखरे हा सगळ्या फोटोग्राफर्सचा एकदम आवडता विषय. अत्यंत मोहक छटा आणि असंख्य प्रकार.

जितके सुरवंटाचे आयुष्य बांधलेले , तितकेच फुलपाखराचे स्वच्छंदी. स्वतःचे भविष्य माहित नसताना 
जगणाऱ्या सुरवंटाला कदाचित दुनिया माहीतच नसते आणि स्वतःच्या कुवतीची जाणीवही नसते. हत्ती पिल्लू 
असताना एका लहान साखळीने बांधतात. तो मोठा झाला तरी त्याला वाटते कि साखळी बांधली असेल तर मला
फिरता येणार नाही. 

सुरवंटाच्या कोशातून बाहेर आलेल्या फुलपाखरालाच माहित असते कि झाडाच्या आणि पानफुलांच्या
पलीकडेही एक सुंदर जग आहे. आपण सगळेच त्या सुरवंटासारखे एका विशिष्ठ कोशात आणि नियमांच्या
वर्तुळात जगत असतो. नियम तोडण्याची खुमखुमी सगळ्यात असते पण त्या खुमखुमीचे रुपांतर सत्यात
फार कमी वेळा होते. आपल्या चौकटीतून दिसणारे जगच खरे आहे हि आपली सार्थ समजूत असते. आपले निर्णय आणि दिशा आपण आपल्याच पट्टीने मोजतो म्हणून निकाल विरुद्ध लागण्याची शक्यताच नसते ...

सुरवंटाच्या कोशातून कधीतरी बाहेर पडावं
न रुचणाऱ्या प्रश्नाचं उत्तरांनी समाधान करावं 

जाणूनबुजून सावलीला अंधार म्हणावं
नियमांच्या वर्तुळाला काही क्षणी छेदून पहावं

देठावर चालताना
स्वच्छंदी उडण्याचे स्वप्न पहावं
पाने कुरतडताना
परागकण वेचण्याचे ध्यानी ठेवावं

साधं सोपं चांगले वाईट .. पट्टी बदलून मोजावं
खरे जाणून घ्यायला खोट्याचे नाटक करावं

सुरवंटाच्या कोशातून कधीतरी बाहेर पडावं ...

बेधुंदपणे आयुष्याचा आस्वाद घ्यावा
संयमाला कल्पनेच्या क्षितीजावर वसावावं ...

जगावं तर फुलपाखरासारखे 

फुलासारखे सतेज बनून 
पाखरासारखे स्वच्छंदी फिरावं ....

दृष्टीस उमजणारे नात्या पलीकडचे जग  पहावं
सुरवंटाच्या कोशातून कधीतरी बाहेर पडावं ...

No comments:

Post a Comment